मला तशी पुण्यात राहून चांगली दोन वर्षे होत आली.पण अजुनही अस्सल म्हणवेत असे खास पुणेरी अनुभव आलेले नाहीत. ह्याचा अर्थ पुणेकर माझ्याशी ’तिळगुळ’ घेतल्यासारखं बोलतात असा मुळीच होत नाही. आता, ह्यात चूक माझीही आहे- नाही असं नाही.मी तसा गावापासून लांबच रहातो. त्यामुळे ’नमुने’ भेट्ण्याची शक्यता तेवढीच कमी होते. पौड रोड, चांदणी चौक, औंध अशा मागासवर्गीय भागात हे नरपुंगव कधी भट्कत नाहीत
पण अलिकडेच एका व्याख्यानाला जायचा योग जुळून आला. विषयही अस्सल पुणेरी - "भांडारकर रस्त्यावरील वाहतूक खोळंब्यामागे परकीय शक्तीचा हात आहे काय?"
पुढे " प्रचंड गर्दीचा दुसरा आठवडा" असंही लिहिलेलं दिसलं.
"कमाल आहे हो! दोन आठवडे चालू आहे हे व्याख्यान...मानलं पाहिजे", मी बाजूच्या एका वॄद्ध गॄहस्थांना म्हटलं.
"अहो कसला दुसरा आठवडा?.. ’चावट कुठला’ नाटकाचा बोर्ड आहे तो. त्यावरच चिकटवलंय हे व्याख्यानाचं",तो गॄहस्थ म्हणाला.
"काय सांगता! भलतंच!"
- हे दोन शब्द उच्चारल्यावर मला जाणवलं, की मी चुकून एका अद्रूश्य टेप रेकॉर्डरचं PLAY बटण दाबलंय.
"मग! काय अर्थ आहे ह्याला सांग बरं तू मला. एवढा ज्वलंत विषय, आणि त्या पुढे हे असलं वेडंवाकडं शोभतं का!", तो मनुष्य आता उभा पेटला होता. "रक्ताचं पाणी आणि हाडाची काडं करून आम्ही स्वातंत्र्य मिळवलं, ते ह्यासाठी?..... काय?"
"स्वतःच्या जीवाची पर्वा न करता हजारो लोकांनी बलिदान दिलं ते, ते फ़ुकट!.... काय?"
" अरे आज तुमच्या एवढ्या पोरांना शिकता येतं, कुठेही बिनधास्त ( त्याने ’त’ पूर्ण उच्चारला) फिरता येतं, ते विसरलास का तू?"
"नाही, म्हणजे काय आहे आजोबा...." मी त्या मनुष्य रूपी टेप रेकॉर्डरचं 'PAUSE' बटण शोधता शोधता म्हणालो.
"आ जो बा?", तो मनुष्य एकेका शब्दावर जोर देत ओरडला.
आता स्वतंत्र्य लढ्यात भाग घेतलेल्या माणसाला २००८ साली ’काका’ म्हणता येतं, ह्यावर एखादा जीवाणुसुद्धा विश्वास ठेवील असं मला वाटत नाही.आणि देव आनंदची गोष्टच वेगळी आहे.
"तू मला आजोबा म्हणतोस?"
"मग तुम्ही काय स्व्तःला शाहीद अफ्रीदी समजता काय?", मी हा डायलॉग मारायचा मोह टाळला. मला ’१९४०-५०-६०’ मधील क्रिकेट, ह्या विषयावर चर्चा नको होती.
"रोज पंचवीस दंड आणि वीस उठाबशा काढतो. न चुकता, काय?", आजोबारूपी काका म्हणाले.
"ह्यं ह्यं ह्यं..... ", मी ठेवणीतलं हसू बाहेर काढलं.
"हसतोस काय तरसासारखा? रोज व्यायाम करीत जा. अरे शरीर म्हणजे कसं, तजेलदार हवं. ’मारुती भुते’ हे नाव ऐकलंच असशील....."
’मारुती भुते’ ... नाही. database पूर्ण शोधूनही मला अशा नावाचा एकही रेकोर्ड सापडला नाही. पण नाही म्हटलं, तर मारूती भुतेपुराण चालू झालं असतं.
"वा! मारुती भुते महिती नाही,असं कसं होईल? आमच्या घराच्या खालीच त्यांचं साडीचं दुकान आहे! अप्रतीम माल मिळतो तिथं...." मी हल्ला चढवला.
"साडी????", काकारूपी आजोबांच्या तोंडातून फ़ेस यायचा बाकी होता. वरणावर पिळलेल्या लिंबासारखा त्यांचा चेहरा झाला.
पण ते पुढे काही बोलणार एवढ्यात मी गडप झालो.
5 comments:
marathi vachayla maja yetey..lihit ja nehami...
chya maaila...! :P
mee pann vaachlo.. pan devaaa kaay kasht re...! chal pune sodnyapoorvi ek saadi ghe maruti bhuthekadun aaisaathi...!! :P
maruti bhute kadun saadi??!!
lol
Punyacha kadhi experience nahi mala.
Pan majedaar prasang.. लोळ
Post a Comment