तानाजी गोंधळात पडला होता.
आज काल त्याला काही कळेनास झाले होते. परवा परवाची पोरे येऊन महाराजांना काही बाही शिकवू लागली होती.
जुन्या, जाणत्या लोकांना त्यामुळे "पोटदुखी" ह्या विकाराने ग्रासले होते.
"काय म्हणावा आता शिवबाला !", तानाजीने मिशीला पीळ भरता भरता विचार केला. "कोण कुठले लोक, वाट्टेल ते बोलतात. आणि महाराज ऐकून घेतात !. काय वाट्टेल ते चालू आहे ह्या महाराष्ट्रात. जाऊन जरा खबर बात घेतलेली बरी.", तानाजी आपली तलवार हाती घेऊन घोड्याला बाहेर काढावा, म्हणून निघाले.
पाहतात तर काय - पागेत घोडा नाही !
"अहो, माझा घोडा कोणी नेला ?", तानाजींनी आत आवाज लावला.
"आहो, घोडा कशाला म्हणते मी. जरा चालावे माणसाने. नुसते बसून बसून पोट सुटलाय बघा कसं.", मागून आवाज आला.
अजून काही ऐकायला नको, म्हणून तानाजी लगबगीने दाराबाहेर पडले.
"हो - समोरच्या भैयाकडून तूरडाळ आणा १ किलो. आणि विड्या ओढू नका हो। काय मेला दिवसभर धूर.", हेसुद्धा त्यांच्या कानी पडलंच !
******
तानाजी दाराबाराशी आले आणि चकितच झाले. दरबाराचा चेहरामोहरा अजाबात बदलून गेलेला !
"काय चाललाय काय?", त्यांनी समोरच्या मावळ्याला विचारले.
"क्या हुवा साहेब?", तो मनुष्य प्रश्नार्थक चेहेर्याने तानाजींकडे बघू लागला.
"मोंगल शिपाई आणि इथे ! दगा ! धोका !!" - तानाजींची तलवार बाहेर आली आणि ते वार करणार एवढ्यात कुणीतरी ओरडले - " थांबा हो ! तोः आपलाच माणूस आहे."
"आहो पण - मोंगल असेल - उत्तरेची भाषा बोलतोय. तुम्हाला मी सांगतो -", तानाजी जोशात आले.
"नको. महाराजांनीच ठेवलेत ते लोक. त्यांनाच सांगा."
महाराज म्हटल्यावर तानाजी निमुटपणे शोएब समोरच्या गांगुलीसारखे परत फिरते झाले.
विटा, सिमेंटची देवाणघेवाण करणार्याकडे त्यांना विडी दिसली. "बर झाले. सापडला. नाहीतर घरी कटकट.!" असं पुटपुटत
ते विडी मागायच्या विचारात होते.
"క్యా కరత రే తుం !!", तो विडीधारी माणूस बोलता झाला - आणि औरंगजेब दिसावा तसे तानाजी चमकले!
"अरे अरे .. काय बोलतोय हा !"
"तेलुगु आहे तो. विटा-सिमेंट- घरबांधणी ह्यात फार पटाईत आहेत ते लोक. आणि स्वस्त सुद्धा." - एक रिकामटेकडा मावळा कट्ट्यावरून पचकला.
"महाराजांना भेटायलाच हवं...." तानाजी गंभीर झाले.
*****
"या तानाजी - कसं येणं केलं!", महाराज नेहेमीसारखेच प्रसन्न हसत म्हणाले.
"विडी .. नाही आपलं. सहजच आलो होतो. बरेच दिवस खबर नाही महालाची.
"अच्छा . छान . तुमचा सल्ला हवा होता एका बाबतीत. आम्ही computer course करावा म्हणतोय. कुठे आणि कधी ते जरा बघत होतो. तुम्हाला काय वाटत ?"
तानाजी बिचकले. महाराजांना काही भूत-पिशाच्च वगैरे तर ...
"काय बोलताय महाराज ? हे आजकालच खूळ. आपल्याला कशाला हवे हे ? नुकसानच होणार ह्या असल्या गोशीमुळे."
"अरे अरे .. काय बोलताय हे तानाजी-"
"होय महाराज. स्पष्ट बोलतो. आपण आजकाल नव्या नव्या बाहेरच्या लोकांना संधी देताय. उत्तरेकडचे भय्ये - त्यांनी सामान सुमान विकण्याचा मक्ता घेतलेला आहे. गुजराती तर वाणी म्हणून आता इथलेच झाले आहेत. तेलुगु, मंडळी हॉटेल आणि घरकामाचे मजूर म्हणून सगळीकडे दिसतात. मग आपले मराठी लोक कुठे जाणार ?महालात देखील --"
"अस्स. globalization चा जमाना आलं तानाजी, आहात कुठे? युरोप आणि अमेरिकेचे लोक देखील आता इथल्या लोकांशी स्पर्धा करणार आहेत. तिथले शेतकरी आता इथे माल पाठवणार आणि तिथले कारगीर आता इथे वस्तू विकणार. आपली स्पर्धा असणार आहे ती ह्या लोकांशी. पुढचा विचार करायला हवा तानाजी, डोळ्यावर झापड़ बांधून चालणार नाही.
अहो उत्तर,दक्षिण कसलंघेऊन बसलात - सगळच आपल आहे आता. कोण कुठले लोक पोटापाण्यासाठी आपल्या देशात ख़ुशीने का फिरतात ? गरज आहे ही काळाची.
"पण महाराज हे आपले लोक ठीक आहे. computer आणि पाश्चात्त्य लोकांकडून आपली संस्कृती -"
"तानाजी, आहो साधी गोष्ट आहे. twinkle twinkle little star म्हणून आणि cake कापून जर का आपली संस्कृती भ्रष्ट होणार असेल, तर तुम्ही "संस्कृती" कशाला म्हणताय, हेच मुळात चुकतंय. ह्या छोट्या छोट्या गोष्टी मजा म्हणून करायच्या.
आणि computer म्हणाल तर काळाची गरज आहे ती ! सगळी दुनिया पुढे जात असताना आपणही पुढेच जायला हवा.मग तिथे उत्तर-दक्षिण - पश्चिमी असं म्हणून चालणार नाही. महाराष्ट्राला मर्यादा आहे ती फक्त मराठी माणसाच्या हिंमतीची. काय?"
"असं म्हणता ? आम्हाला वयाप्रमाणे जरा सुस्ती आली होती. मन सुद्धा आळशी झालेले! त्याला सोयीपुरातच दिसत होते."
"ही चूक करून चालणार नाही आता. नुसता मराठी मराठी बोलला, म्हणजे काही होणार नाही. आपल्याला काम करायला हवं तानाजी. प्रत्येक कामात निपुणता कशी मिळवता येयील, ह्या ध्यासाने काम केलं पाहिजे. हर एक क्षेत्रात मराठी लोकांचे नाव आदबीने घेतले जाईल, असा निश्चय हवा !. पटतंय का -"
"होय महाराज. मी आजपासूनच आपल्या मावळ्यांना तयार करतो - technology का काय म्हणतात त्याचे धडे गिरवायला हवे सगळ्यांनी"
"वा. चला तर. या आता तुम्ही." महाराज laptop कडे वळून म्हणाले.
"होय सरकार. जसा हुकुम", तानाजी माघारी वळले, आणि दरबाराबाहेर जाणार एवढ्यात महाराजांची हाक आली -
"अरे हो, आणि तानाजी, तेवढा orkut वर testimonial पाठवलाय, तो जरा स्वीकार करा लवकर!"
हे शेवटलं काय ते मात्र तानाजींना समजल नाही !!